खासदार रिपोर्ट कार्डविषयी

आज देशातल्या सर्वच्या सर्व, जवळपास साडेपाचशे लोकसभा खासदारांचे, २०१९ ते २०२० या नवीन (१७ व्या) लोकसभेच्या पहिल्या वर्षाचे रिपोर्ट कार्ड तुमच्या हातात देताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. मतदारांची जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने, पुणे महानगरपालिका पातळीवर २०१२ पासून आम्ही परिवर्तनतर्फे सातत्याने नगरसेवक रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध केले आहे. त्याच उपक्रमाचा गेल्या वर्षीपासून सुरु झालेला हा पुढचा टप्पा म्हणजेच- खासदार रिपोर्ट कार्ड!

नागरिकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नेमके काय काम करतात याची तपासणी व्हायला हवी, मूल्यांकन व्हायला हवे. हे मूल्यांकन नेमकेपणाने केल्यास, मतदार हा सजग व्हायला मदत होईल. सजग मतदार म्हणजेच Informed Electorate ही निकोप आणि सुदृढ लोकशाहीसाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. सध्याच्या असंख्य फेक न्यूजच्या कलकलाटात; अधिकृत आकडेवारीसह तयार केलेला हा वस्तुनिष्ठ अहवाल उपयुक्त ठरेल असा आम्हाला विश्वास वाटतो.

रिपोर्ट कार्डचे निकष

खासदाराचे नेमके काम काय या प्रश्नाच्या उत्तरातून ‘खासदार रिपोर्ट कार्ड’साठी कोणते निकष ठेवावेत या प्रश्नाचेही उत्तर मिळाले. खासदार ही व्यक्ती लोकसभेत बसते. लोकसभा म्हणजे तांत्रिकदृष्ट्या कायदेमंडळ. या कायदेमंडळाची आणि अर्थातच सर्व खासदारांची दोन मुख्य कामे आहेत- एक म्हणजे, कायदे तयार करणे आणि दुसरे म्हणजे, सरकारच्या कारभारावर अंकुश ठेवणे. आणि हे करण्यासाठी लोकसभेत खासदारांकडे जी आयुधे आहेत त्यांचा त्यांनी वापर कसा केला आहे हे बघणे महत्त्वाचे होते. तेच मुख्य निकष ठरले-

  • - लोकसभेतली प्रत्येक खासदाराची उपस्थिती
  • - प्रश्न विचारून, सरकारकडून माहिती घेणे, सरकारला जाब विचारणे.
  • - कायदे, लोकहिताचे प्रश्न याबद्दलच्या चर्चांमध्ये खासदारांचा सहभाग.
  • - लोकसभेत खासदार या नात्याने स्वतंत्रपणे कायदे मांडणे.
या चार मुख्य निकषांच्या पलिकडे अजून एका निकषावर परिवर्तनने काम केले आणि ते म्हणजे-
  • MPLADS (Member of Parliament Local Area Development Scheme).
प्रत्येक खासदाराला त्याच्या/तिच्या मतदारसंघात स्थानिक पातळीवर विकासकामे करण्यासाठी दरवर्षी ५ कोटी रुपयांपर्यंत निधी वापरता येतो. यापैकी किती निधीचा वापर केला आहे याचीही तपासणी आम्ही केली आहे. खासदारांनी हा निधी नेमक्या कोणत्या प्रकारच्या कामांसाठी वापरला याचेही तपशील दिले आहेत.

माहितीचे स्त्रोत
या वेबसाईटवरील बहुतांश माहिती ही लोकसभेच्या या अधिकृत वेबसाईटवरून घेतली आहे. तसेच MPLADS बाबतची माहिती सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरूनच घेतली आहे. खासदार रिपोर्ट कार्डमध्ये केवळ अधिकृत आणि वास्तव माहिती असावी यासाठी हे काटेकोरपणे पाळलं आहे.

  • लोकसभा वेबसाईट : www.loksabha.nic.in
  • MPLADS वेबसाईट : www. mplads.gov.in

सदर माहिती जास्तीत जास्त अद्ययावत असावी यासाठी माहितीचे संकलन अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत चालू होते. २० एप्रिल २०२० पर्यंतची MPLADS च्या वेबसाईटवरील, तर ३१ मे २०२० पर्यंत लोकसभा वेबसाईटवर असणारी माहिती या रिपोर्ट कार्डमध्ये दिसेल.

महत्त्वाच्या सूचना-

  • एखाद्या खासदाराबद्दलची माहिती रिपोर्ट कार्डमध्ये दिसत नसल्यास ती माहिती लोकसभेच्या वा MPLADS च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध नाही असे समजावे.
  • काही जागांवर खासदार पाच वर्ष पूर्ण होण्याआधीच बदलले आहेत. पोटनिवडणुका झाल्या आहेत. अशावेळी जुन्या व नवीन अशा दोन्ही खासदारांची माहिती दिसेल
  • परिवर्तनने ठरवलेल्या निकषांमध्ये भर घालून, आत्ताच्या कमतरता भरून काढून, अधिक सविस्तर रिपोर्ट कार्ड बनवणे शक्य आहे याची आम्हाला कल्पना आहे. पुढच्या वेळी, अधिक खोलात शिरून मूल्यांकन करण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असणार आहे.
  • माहिती संकलनात परिवर्तनकडून कोणतीही चूक राहणार नाही याची पुरेशी काळजी आम्ही घेतली आहे. मात्र तरीही, एखादी माहिती चुकली आहे असे निदर्शनास आल्यास ते आमच्यापर्यंत पोहचवावे. योग्य ती खातरजमा करून दुरुस्ती केली जाईल.
  • खासदार रिपोर्ट कार्डचा उद्देश कोणाचीही बदनामी करणे हा नसून, अधिकाधिक वस्तुनिष्ठपणे खासदारांच्या कामकाजाचे मूल्यमापन करणे हा आहे. परिवर्तन कडून मानवी चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी आम्हाला सहाय्य करावे हे नम्र आवाहन.

परिवर्तन कार्यकर्त्यांचे कौतुक

गेला जवळपास दोन महिना परिवर्तनचे कार्यकर्ते आपापले शिक्षण-नोकरी-व्यवसाय साभाळून, करोना संकटाच्या काळातल्या अडचणींना तोंड देत या प्रकल्पाच्या कामात झोकून देऊन काम करत होते. परिवर्तनचे सर्व कार्यकर्ते हे स्वयंसेवक आहेत आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने काम करतात. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

माहिती संकलन आणि तपासणीच्या कामात सायली दोडके, कल्याणी थिगळे, अमृता नागटिळक, अनिकेत राठी, यशस बेदरकर, अभिषेक कर्वे, अवनी वेले, जुई आठवले, इंद्रनील सदलगे, तन्मय कानिटकर, हृषीकेश कर्वे, अनिश गोळे, प्रतीक गांधी, क्षितिजा ठाकरे, पल्लवी शिंदे यांनी मोलाचे योगदान दिले. दीपक टावरी, स्वानंद देव आणि संदीप पवार यांनी खासदार रिपोर्ट कार्डची ही वेबसाईट तयार करण्याचे महत्त्वाचे काम समर्थपणे पेलले.

खासदार रिपोर्ट कार्ड अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सोशल मिडियामधून प्रसाराचे काम दीपक बाबर, अनिकेत राठी आणि अशोक सुलोचना गणपत यांनी केले.

त्याशिवाय, या प्रकल्पात सहभागी होण्याविषयीचे आवाहन आम्ही फेसबुकवर केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत; रसिका सामक, तन्मय चव्हाण या सर्वांनी माहिती संकलनात महत्त्वपूर्ण हातभार लावला.

खासदारांच्या २०१९ ते २०२० या पहिल्या वर्षाच्या कामाचा लेखाजोखा मांडणारे हे रिपोर्ट कार्ड भारतीयांच्या पसंतीला उतरेल अशी आम्हाला खात्री आहे. तसेच अशा प्रकारे लोकप्रतिनिधींच्या कामाचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन स्थानिक पातळीवरही करण्यासाठी इतर राज्य, शहरे, गावे इथे परिवर्तनचा हा प्रकल्प पथदर्शी ठरू शकतो असा आम्हाला विश्वास आहे. तुम्हा सर्वांच्या सूचना, प्रतिक्रियांचे स्वागत आहे.


शुभेच्छांसह,
- अंकिता अभ्यंकर (अध्यक्ष, परिवर्तन)
२२ जून २०२०